महाराष्ट्रातील जनतेचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी वैद्यकीय पायाभुत सुविधा बळकट करु -आरोग्य मंत्री तानाजी सावंत

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
विशेष वार्ता
- राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागात आवश्यक असलेल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासोबतच आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला देशात अव्वल क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आपण सर्व मिळून काम करूया, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.

औरंगाबाद तसेच लातूर विभागातील आरोग्य सेवेचा आरोग्यमंत्री श्री. सावंत यांनी आज आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त संचालक डॉ.रघुनाथ भोई, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ.श्रीमती बी. एस.कमलापूरकर, औरंगाबाद विभागाच्या उपसंचालक डॉ. महानंदा मुंडे, लातूर विभागाचे उपसंचालक डॉ.पी. एम.ढोले उपस्थित होते.
आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, रुग्णाला दर्जेदार आरोग्य सेवा देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. आपण आपली सेवा प्रामाणिकपणे पार पाडत असून शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आरोग्य विभागातर्फे राज्यात १८ वर्षावरील महिला, गरोदर स्त्रिया, माता यांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ आणि शून्य ते अठरा वर्षांपर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ हे अभियान राबविण्यात येत आहे. अशा अभियानामुळे राज्याच्या आरोग्य सेवा सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.

