राज्य

दिव्यांगासाठी विविध योजनांचे लागणार 27 स्टॉल व 14 ऑक्टोबर ला दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी

भंडारा, दि. 11: दिव्यांग कल्याण विभागाचे प्रमुख मार्गदर्शक श्री .बच्चू कडू यांच्या उपस्थितीत भंडारा जिल्ह्यात 14 ऑक्टोबर रोजी चैतन्य पोलीस ग्राउंड येथे होणाऱ्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या कार्यक्रमात विविध विभागाचे एकूण 27 स्टॉल लागणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध विभागांच्या योजनाची माहिती तसेच दिव्यांग सुलभ साहित्याचेही स्टॉल असणार आहेत .


या अभियानामुळे एकाच ठिकाणी दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. दिव्यांगाशी संबंधित सर्व कार्यरत विभागांनी त्यादिवशी कार्यक्रमात स्टॉल लावण्याचे तसेच दिव्यांगांना पूरक साधनांचे वाटप करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.


त्यांच्या नियंत्रणाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, मनीषा कुरसुंगे या समितीच्या सदस्य शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान सुरु केले असून आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे या अभियानाचे मुख्य मार्गदर्शक आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात 14 ऑक्टोबरला मोठ्या व भव्य प्रमाणावर हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.


दिव्यांग बांधवांमध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांग आहेत. त्यातील अनेक जण विभागीय स्तरावर तसेच शासकीय कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकत नाहीत. त्यामुळे शासनानेच दिव्यांगांना आपल्या अडीअडचणी मांडण्यासाठी उपाययोजना केली आहे. त्यांना विविध योजनांचा लाभ तसेच त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी शासनाने “दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी” हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.


या शिबिरात वैश्विक ओळखपत्र देण्याच्या कार्यक्रमाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर शेत जमिनी संबंधित कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्र व अन्य आवश्यक प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी देखील या एक दिवसीय शिबिराची मदत मिळणार आहे. शासनाच्या विविध योजनातून तसेच सामाजिक संस्था यांच्या सीएसआर मधून उपलब्ध झालेली दिव्यांगांना लागणारी विविध उपकरणे देखील वाटप करण्यात येणार आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली असून त्यांची मुख्य मार्गदर्शक म्हणून या अभियानाकरिता नियुक्ती केलेली आहे.
या मेळाव्यात प्रातिनिधिक स्वरूपात दिव्यांगांना लाभ वाटप होणार आहे तसेच दिव्यांग प्रमाणपत्र,यूडी आयडी कार्ड , दिव्यांग मतदार नोंदणी ,आधार कार्ड नोंदणी ,जाती प्रमाणपत्र, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र व इतर दाखले याचे लाभ, दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या योजना तसेच महावीर कृत्रिम अवयव निर्मिती स्वयंसेवी संस्था, नागपूर यांच्या मार्फत यांच्यामार्फत दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव यासाठीचे स्टॉल लागणार आहेत.
यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयतर्फे देखील स्टॉल लावण्यात येणार असून संत रोहिदास विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, कौशल्य विभाग, नगरपरिषद, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठीचा स्टॉल या स्टॉलचा समावेश आहे. तरी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आपले विनित,
श्री. योगेश कुंभेजकर (जिल्हाधिकारी भंडारा), श्री. समीर कुर्तकोटी (मुख्य कार्यकारी अधिकारी, ZP भंडारा), श्री. लोहित मतानी (पोलीस अधीक्षक भंडारा).
From
शेषराव गणवीर
तुमसर तालुका प्रमुख –
प्रहार अपंग क्रांती संघटना तुमसर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button