स्मार्ट पोलिसिंग व तंत्रज्ञानाचा वापर वाढवायला हवा – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यातील मोठ्या शहरांमध्ये सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले. कमांड अँड कंट्रोल सिस्टीम सुरु केली आहे. यामुळे पोलिसिंगमध्ये गुणात्मक बदल झाला आहे. तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे. सर्वच गोष्टी पोलिसांच्या संख्येने नियंत्रित करता येत नाही. आपला देश मोठा आहे, आपली शहरे मोठी आहेत, तेथील आव्हाने वेगवेगळी आहेत. तंत्रज्ञानाचा व स्मार्ट पोलिसिंगचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. तंत्रज्ञानाधारित यंत्रणा वापरायला हवी.
आजच्या काळात समाज माध्यम व डिजिटल माध्यमांमुळे आव्हाने वाढली आहेत.
भविष्यात सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात होतील. त्यासाठी सायबर कक्षाकडे महत्त्वाचा घटक म्हणून पहायला हवे. गुन्ह्यांमध्ये तांत्रिक पुरावे हे अधिक महत्त्वाचे असतात. त्यामुळे अशा पुराव्यांचा उपयोग करून गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. महिलांच्या संदर्भातील गंभीर गुन्ह्यांमध्ये आता 90 दिवसांमध्ये चार्जशीट पाठविण्याचे प्रमाण 60 टक्क्यांवर आहे ते 90-95 टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. महिलांविषयक खटल्यांमधील न्यायालयीन निर्णय लवकरात लवकर व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असून राज्यात जलदगती न्यायालयाची संख्या वाढविण्याचाही प्रयत्न सुरु असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

पोलीस महासंचालक रजनीश शेठ म्हणाले की, महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस सातत्याने कटिबद्ध आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना पोलीस दलातर्फे करण्यात येत आहेत. महिला सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलिसांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. पीडित महिलांना मदत मिळावी, यासाठी पोलीस ठाणेस्तरावर कौटुंबिक हिंसाचार, अत्याचारग्रस्त महिलांचे समुपदेशन व कायदेविषयक सल्ला उपलब्ध करून देणे असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. अत्याचार पीडितांना समुपदेशन देण्यासाठी विधी सल्लागार व महिला अधिकारी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पोलीस ठाण्यात पीडित महिलांना योग्य वागणूक व मदत मिळावी, यासाठी राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यात महिला सहाय्यता कक्ष निर्माण करण्यात येतील.

गुन्हे रोखण्यासाठी व उकल करण्यासाठी प्रत्येक शहरातील खासगी सीसीटीव्ही हे पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला जोडणे आवश्यक आहेत, असेही श्री. शेठ यांनी सांगितले.




