कोर्टी गावचे सुपुत्र संतोष श्रीरंग नवले सर यांना पुणे जिल्हास्तरी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

पोलीस की आवाज न्यूज वार्ता प्रमिला जाधव ,(पश्चिम महाराष्ट्र) सहसंपादक
कळमना वार्ता:-पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण समारंभात कोर्टी गावचे सुपुत्र, अमृतेश्वर माध्यमिक विद्यालय, कोंढूर (ता. मूळशी, जि. पुणे) येथील मा. श्री. संतोष श्रीरंग नवले सर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा भव्य सोहळा रविवारी आळेफाटा (ता. जुन्नर) येथील तुलसी पॅलेस मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, टीडीएफ, माध्यमिक शिक्षिका संघ, उच्च माध्यमिक शिक्षक संघ तसेच सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील तब्बल ६२ गुणवंत शिक्षकांचा सत्कार करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
नवले सर मागील १९ वर्षांपासून शिक्षक या नात्याने कार्यरत असून, आपल्या कार्यतत्परता, नवोन्मेषी अध्यापन पद्धती व विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम यामुळे त्यांचे नाव आदर्श शिक्षकांच्या यादीत नेहमीच अग्रभागी राहिले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न आणि शाळेत निर्माण केलेले शैक्षणिक वातावरण हे विशेष कौतुकास्पद मानले जाते.
या यशाबद्दल कोर्टी गाव तसेच मूळशी तालुक्यातील नागरिकांनी अभिमान व्यक्त केला असून, नवले सरांचे सर्व स्तरांतून हार्दिक अभिनंदन होत आहे.
“शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे आणि संतोष श्रीरंग नवले सरांच्या रूपाने या शिल्पकाराचा सन्मान झाला आहे,” अशा भावना या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आल्या.



