मौदा नगरपंचायत सफाई कामगारांचा कामबंद आंदोलन
मौदा, 21 मे: मौदा नगरपंचायतमधील सफाई कामगारांनी आज सकाळी 9 वाजता अचानक कामबंद आंदोलन पुकारले. फेब्रुवारी व मार्च महिन्याचे वेतन केवळ ₹4000 ते ₹4250 इतकेच जमा करण्यात आल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तुटपुंज्या पगारात घरखर्च चालवणे अशक्य असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून “जगावं की मरावं?” असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
या प्रश्नाची दखल मौद्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली असून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात, जर या परिस्थितीला मुख्याधिकारी जबाबदार असतील तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा दोषी कंत्राटदाराची निविदा तात्काळ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगरपंचायत मौदा येथे सफाई कामगारांची नेमणूक कंत्राटदारामार्फत होते. आउटपुट बेस प्रणालीअंतर्गत कंत्राटदाराने कामगारांच्या कामाची नोंद मोजमाप पुस्तिकेत करणे बंधनकारक आहे. त्यात QR कोड व इतर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मात्र, अशिक्षित कामगारांना ही तंत्रज्ञान प्रक्रिया समजत नसल्याने त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन होत नाही आणि परिणामी त्यांना योग्य मोबदला मिळत नाही.

कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
धम्मपाल बौद्ध जिल्हा प्रतिनिधी नागपूर



