मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेसाठी गतीने व समन्वयाने काम करा
-मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी
भंडारा, दि. 2- राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे . या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै असून यासाठी तालुका पातळीवर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी समन्वय्याने काम करावे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम असल्याने ही योजना ग्रामपंचायत पातळीवर पोहोचवावी असे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी आज दिले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी महिला बालविकास अधिकारी मनीषा कूर्सुंगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नंदा गवळी तसेच यांनी विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. सर्व तहसीलदार व गटविकास अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी हे ऑनलाइन उपस्थित होते.


याविषयी बोलताना श्री.कुर्तकोटी म्हणाले की संबंधित शासन निर्णय सर्वांनी वाचून घ्यावा, तसेच याबाबतीत प्राप्त अर्जांची यादी ती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात यावी .कोणाला आक्षेप असल्यास ते ऑफलाईन तसेच ऑनलाईन नोंदवण्यात यावे. हा कालबद्ध कार्यक्रमात असल्याने वय दाखले, उत्पन्नाचे दाखले, बँकेने झिरो बॅलन्स खाती तातडीने उघडावीत. तसेच सेतू केंद्र आपले सरकार केंद्र यामध्ये आलेले अर्ज सध्या ऑफलाईन व नंतर शासनाने दिलेल्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदवावीत. अर्ज करण्याची सुरुवात काल एक जुलैपासून करण्यात आली आहे, तर 10 ऑगस्टपर्यंत लाभार्थ्याचे बँकेमध्ये ई केवायसी उघडायची आहे.



