सूक्ष्म नियोजनाद्वारे 15 ऑगस्टपर्यंतदिव्यांगाची नोंदणी करा- डॉ. विपीन इटनकर
दिव्यांगासाठी दिव्यांग उन्नती पोर्टल उपलब्ध
कोंढाळी- (नागपूर)-प्रतिनीधी दुर्गा प्रसाद पांडे
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

दिव्यांग कल्याण विभागाने सूक्ष्म नियोजन करुन ग्रामस्तरावर दिव्यांग शोध मोहीम राबवावी व जिल्ह्यात युडीआयडी कार्ड व्यतिरिक्त अजूनही दिव्यांग आहेत, त्याचा शोध घ्यावा. या कामासाठी गट विकास अधिकारी यांची मदत घ्यावी. एकही दिव्यांग नोंदणी विना राहणार नाही याची दक्षता घेवून 15 ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधितांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाबाबत बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, समाज कल्याण सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनाचे पदाधिकारी तर दुरदृष्य प्रणालीद्वारे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यावेळी उपस्थित होते.
ग्रामस्तरावरील दिव्यांग शोध मोहिमेत दिव्यांग शाळेच्या शिक्षकांना सहभागी करावे. सोबतच महसूल व ग्रामपंचायतीच्या कर्मचारी यांची मदत घ्यावी. दिव्यांग विभाग जिल्ह्यात दिव्यांगाच्या घरी जाऊन त्यांची नोंदणी करणार आहे. यामुळे जिल्ह्यातील युडीआयडी कार्ड व्यतिरिक्त असलेले दिव्यांग शोधले जावून त्यांना सुविधांचा लाभ देण्यात येईल. 15 ऑगस्टपर्यंत 1 लक्ष दिव्यांग नोंदणीचा लक्षांक गाठावयाचा आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

दिव्यांगाची दिव्यांग उन्नती पोर्टलवर तत्काळ नोंदणी करावी. या पोर्टलवर दिव्यांगाच्या योजना तसेच इतर माहिती उपलब्ध आहे. दिव्यांग उन्नती पोर्टलवर नोंदणी केल्यामुळे दिव्यांगाकडे कोणते प्रमाणपत्र नाही याची माहिती मिळेल व ते त्यांना उपलब्ध करुन दिले जाईल. ज्या दिव्यांगाकडे युडीआयडी कार्ड नाही अशांसाठी सप्टेंबर व आक्टोबरमध्ये शिबीराचे आयोजन करुन त्यांना कार्ड व इतर सुविधा पुरविण्यात येईल. तसेच त्यांच्या स्वयंरोजगाराबाबत मदत करुन 12 रुपयात विमा उपलब्ध करुन दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या मोहिमेत लोकप्रतिनिधींना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. मोहीम समन्वयाने राबवावी त्यामुळे गती येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्यांग व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारांशी संवाद साधून त्यांचा समक्षा जाणून घेतल्या.



