जिल्हास्थरिय मुख्यमंत्री सचीवालय कक्षात प्राप्त अर्ज तात्काळ निकाली काढावे:-मुख्य सचीव मनुकुमार श्रीवास्तव

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★
मुंबई, दि. 6 : स्थानिक पातळीवर नागरिकांच्या अर्जांवर तत्पर कार्यवाही होण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावर सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्ज तातडीने निकाली काढण्याच्या सूचना मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी आज येथे दिल्या.
विभाग आणि जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या कामकाजासंदर्भातील ऑनलाईन आढावा बैठक मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली, त्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्री कार्यालयातील अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यासोबतच दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
नागरिकांना मंत्रालयापर्यंत न येता स्थानिक पातळीवरच सुलभरित्या आपले म्हणणे, अडचणी मांडता याव्यात, यासाठी विभागीय आणि जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याठिकाणी गतिमान कार्यपद्धतीचा वापर करुन प्राधान्याने नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे मुख्य सचिवांनी निर्देशित केले. सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या कक्षाकडे प्राप्त अर्जांवर तत्पर कार्यवाही करण्यासाठी यंत्रणांवर, क्षेत्रीय कार्यालयांवर नियंत्रण ठेवावे. लोकांचा शासन, प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या व्यापक जाणीवेतून प्राप्त प्रत्येक अर्ज, निवेदन तातडीने निकाली काढण्यात यावे. ई-ऑफीसच्या माध्यमातून हे काम अधिक गतिमानतेने करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी सेतू केंद्राच्या माध्यमातून पूरक व्यवस्था, आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता ठेवावी.



