महाराष्ट्र राज्यात ड्रग्जविरोधात अभियान राबविणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि. १४ पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क: -युवा पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून सोडविण्यासाठी राज्यात ड्रग्जविरोधात व्यापक अभियान छेडण्यात येईल आणि त्यासाठीची रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची एक बैठक आज पुणे येथे झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते.

या बैठकीत विविध विषयांवर सादरीकरण करण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांची स्थिती आणि त्यावर पोलिसांचा प्रतिसाद, गुन्हे वाढीची कारणे याचा समग्र आढावा या बैठकीत घेण्यात आला. अपराधसिद्धीचा दर वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवरही चर्चा झाली. आता नव्या सरकारमध्ये बदल्या आणि पोस्टिंगसाठी भ्रष्टाचाराला कुणालाही सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे पोलिसांनीसुद्धा पारदर्शी पद्धतीने काम करावे आणि पोलीस दलाला पूर्वीचा नावलौकिक प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन श्री. फडणवीस यांनी केले.
बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी सागरी सुरक्षेच्या प्रस्तावांना तातडीने गती देण्याचेही निर्देश दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेटी द्याव्यात, तपासावरील देखरेखीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यात यावी, वेगवेगळ्या जिल्ह्यातील चांगल्या तपास पद्धतींचा स्वीकार करावा, अशा सूचना देतानाच वाळू आणि दारुची तस्करी करणाऱ्यावर कठोर प्रहार करावा, असे निर्देश दिले.



