बापूंचा पुतळा टाकतोय कात!

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूनही ते उपेक्षीतच
🎤पंकज वानखेड
शिर्षक वाचून कोणालाही अचंबा वाटेल, होय पण हे खरं आहे. भंडारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नगरपालिकेच्या थेट समोर तब्बल 69 वर्षांपासून तटस्थपणे उभा असलेला महात्मा गांधी यांचा पुतळा कात टाकतोय. या पुतळ्याला ठिकठिकाणी तडे गेलेत. भेगा पडल्यात आणि खिपलं बाहेर पडण्याचा तेवढा अवकाश आहे. एका अर्थाने कात टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ नवनिर्मिती असा होतो. पण इथे मात्र, दुरान्वये हा संबंध नाही. नगरपालिका, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहरातील लहानमोठ्या घटनांचा मूक साक्षीदार असलेला पुतळा भणंग होत चालला. पण याचे कोणालाच काही सोयर-सूतक नाही. फक्त त्यांच्या उत्साह आणि उन्मादाचे ओझे आपल्या अंगावर झेलत आता बापूंनीही ‘हार’ मानली आहे.
बॉक्स..
तेव्हा होता फव्वारा चौक
महात्मा गांधी भंडाऱ्यात दोनदा येवून गेले. पहिल्यांदा ते 2 फेब्रुवारी 1927 मध्ये आले होते. खामतलाव मैदानावर त्यांची सभा झाली होती. 10 नोव्हेंबर 1933 रोजी गांधीजी दुसऱ्यांदा भंडाऱ्यात आले. हरीजनांसाठी विहिरी खुल्या करणे, मंदिर प्रवेश हा त्यांच्या आगमनाचा उद्देश होता. खांब तलाव येथील लक्ष्मी नारायण मंदिरात त्यांनी हरीजन प्रवेश करविला. शंकरलाल दयाराम यांच्या विडी कारखान्यात त्यांचा मुक्काम होता. त्यांनी हरीजन फंडाकरिता सभा घेवून दान मागितले. सभेनंतर गांधीजी लाखनीकडे जाण्यासाठी निघाले. तेव्हा जमललेल्या जनसमुदायाने त्यांना नगरपरिषदेसमोर रोखून धरले. हे ठिकाण तेव्हा फव्वारा चौक या नावाने ओळखले जात होते. जनतेच्या आग्रहाखातर येथे पाच मिनिटे थांबून महात्मा गांधीजींनी भाषण दिले होते. तेव्हापासून हे स्थळ गांधी चौक या नावाने ओळखले जाते.
चिकनी चवन्नी गांधी की….
जनतेच्या मनात स्वातंत्र्यांचे स्फुलिंग चेतविणारे महात्मा गांधी भंडाऱ्यात येवून गेले. तेव्हा मोठ्याबरोबर चिमुकलेही आनंदाने भारावले होते. चिकनी चवन्नी चांदी की, जय बोलो महात्मा गांधी की असे नारे लावत चिमुकल्यातही उत्साह संचरला होता. पण आता, मात्र ते दिवस विस्मरणात गेले आहेत. गांधींजी बरोबर त्यांच्या विचारांचा आणि अस्तित्वाचाही आम्हाला विसर पडतोय! मग पुतळ्याचे काय घेवून बसलात? असा प्रश्न कोणी विचारल्यास नवल वाटण्याचे विशेष कारण नाही.
बॉक्स..
निर्भत्सना कधी थांबणार?
महापुरूषांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांचे विचार आत्मसात करणे कधीही श्रेष्ठच! मात्र, इथल्या गांधीवेड्या लोकांना ते कळलेच नाही. ते पुतळा उभारून मोकळे झाले. मात्र, गांधीजींच्या विचाराचा वारसा जपणारी माणसे राजकारणाच्या चढाओढीत गारद झाली. आता उरलीत ती फक्त पोकळ बुजगावणी. गांधींचा मुखवटा ओढून गोडसेंचा आत्मा जगणाऱ्यांकडून आता तुमच्या भेगाळलेल्या, दुभंगलेल्या कायेवर सात्वंनेचा मुलामा चढविण्याची अपेक्षा करणेही रास्त नाहीच! एरव्ही महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होतो. पण इथे तर हे नेहमीच घडते. बापूंच्या खांद्यावर हारांचे ओेझे आणि गुलालांचा रंग उडविला जातो. या दंडासाठी पात्र असणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे.
बॉक्स..
पालिका, प्रशासनालाही विसर
पालिकेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव संपला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचीही सांगता झाली. अमृत महोत्सवात ऐतिहासिक वारशांना नवी झळाळी देण्याचे नियोजन होते. प्रशासनाच्या लेखी हा पुतळा ऐतिहासिक वारसा नसेलही. पण केवळ पुतळ्याच्या सभोवतालचा परिसर तेवढा चकाचक करण्यात आला. गांधीजींच्या भेगाळलेल्या कायेवर मात्र कोणाचीच नजर गेली नाही. कदाचित ते आता हा पुतळा धराशायी होण्याची वाट बघत असावे. अमृत महोत्सवात झालेला खर्च अधिक झाला म्हणून की काय? यंदा गांधी जयंतीनिमित्त बापूंच्या पुतळ्याला रंगकाम न करता पालिकेने काटकसर केली आहे. आज पर्यंत रंगाची लिपापोती करून तरी गांधीजींच्या पुतळ्याच्या शुभ्र कायेवरील काजळी झाकण्याचा प्रयत्न केला जात होता. तोही यावेळी न झाल्याने गांधीजींच्या अंगावरील रंगावरणाचे वस्त्र जणू जीर्ण झाल्याचे दिसून आले.
तुम्ही राष्ट्रपिता होतात. या देशातील कोट्यावधी जनतेवर तुम्ही लेकरांसारखे प्रेम केले साऱ्या जनतेने तेवढे्याच जिव्हाळ्याने तुम्हाला ही पदवी दिली. राष्ट्र नेता आणि राष्ट्रपिता या दोन शब्दात बरेच अंतर आहे. नेता कधीच पिता होऊ शकत नाही. म्हणूनच या गाजावाजा करून साजरा केलेल्या सेवा पंधरवड्यात कोणाचीही नजर तुमच्यावर पडलीच नाही. आणि तुम्ही आपल्या स्वभावाप्रमाणे शांत आणि निर्विकार राहिलात.




