सैनिकांमुळे देशातील नागरिक सुरक्षित – प्राचार्य सीमा चित्रिव



“धागा शौर्य का राखी अभिमान की “नूतन कन्या विद्यालयाचा अभिनव उपक्रम
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)- ऊन, थंडी आणि पावसाची तमा न बाळगता देशाच्या सीमेवर सदैव पहारा देणाऱ्या सैनिकांमुळे आज देशातील नागरिक सुरक्षित जीवन जगत आहेत. तसेच स्वतःची व कुटूंबाची पर्वा न करता देशवासीयांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. असे प्रतिपादन नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सीमा चित्रिव यांनी केले.
त्या नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित “धागा शौर्य का, राखी अभिमान की” या उपक्रमातंर्गत सैनिकांना संदेश रूपी पत्र व राखी कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सीमा चित्रिव, उपमुख्याघ्यापक निलु तिडके, पर्यवेक्षक कैलास कुरंजेकर, सुरेखा डुंभरे उपस्थित होते.
यावेळी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तसेच सैनिकांसाठी पत्ररुपी संदेश व रक्षाबंधनाच्या शुभपर्वावर विविध क्रांती गित विभा नानोटी व श्रध्दा रामेकर यांनी सादर केले. तसेच अंजली सेलोकर, अनुष्का मेहर, नारायणी गिरी, अदिती घोटेकर या विद्यार्थीनींनी भारतीय सैनिक बांधवांच्या यशोगाथा विषयावर प्रकाश टाकला. देशाच्या सुरक्षितेसाठी कार्य करणाऱ्या सैनिकांप्रमाणे जिल्ह्यातील नागरिकांनी ग्रामीण व शहराच्या सुरक्षिते सोबत स्वच्छतेसाठी सजग राहावे व राष्ट्र विकासाकरिता योगदान द्यावे असे मत सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांनी व्यक्त केले.
भारतीय सिमेवरील सैनिक सदैव तैनात असल्याने कुठल्याही सण, उत्सावाला घरी येत नाही. म्हणून नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील एनसीसी कॅडेटस, हरित सेना, स्काउट गाईड व विद्यार्थीनींनी राख्या स्वत: तयार करून संदेश पत्र लिहून सैनिकांना पाठविण्याचा अभिनव उपक्रम सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांच्या प्रेरणेतून पाच वर्षापासून राबविण्यात येत आहे हे विशेष.
कार्यक्रमाचे संचालन व आभार एनसीसी ऑफिसर रश्मी मोहरकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक – शिक्षिका व कर्मचारीवृंद तसेच एनसीसी कॅडेटस, हरित सेना, स्काउट गाईड व विद्यार्थीनींनी सहकार्य केले.