गोंदियात दलितावर जातीय हल्ला, धमकी, लूट आणि पोलिसांचा झाकपट्टीचा कट? – रामनगर ठाणे FIR घेण्यास नकार देते!

आंबेडकरी नेते नितीन राऊत यांच्याकडे तात्काळ तक्रार; सर्व आंबेडकरी समाजाचे लक्ष प्रकरणाकडे
गोंदिया | प्रतिनिधी
गोंदिया शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर आणि धक्कादायक आरोप झाले आहेत. आंबेडकर वार्डातील रहिवासी व आंबेडकरी युवक शुभम सौदागर शेंडे (वय ३२) याच्यावर झालेल्या भीषण जातीय अपमान, धमकी, लूट आणि जीवघेण्या हल्ल्यानंतरही पोलीस ठाण्याने त्याची तक्रार नोंदवण्यास नकार दिला. या प्रकारामुळे संपूर्ण दलित समाजात तीव्र संताप निर्माण झाला असून, घटना केवळ व्यक्तिगत नसून संविधानाच्या मूलभूत हक्कांवर आघात मानली जात आहे.
जातीवाचक अपमान, धमकी व चाकूचा धाक दाखवत लूट!
दि. २२ जून २०२५ रोजी रात्री ९.३० वा, शुभम शेंडे आपल्या “चाय-सुट्टा क्लब” या व्यवसायिक ठिकाणी उपस्थित असताना, परिसरातील रोहित उर्फ जवारी भारद्वाज या इसमाने दुकानात येऊन सवंग भाषेत शिवीगाळ करत, “तुमच्या जातीच्या लोकांची औकात नाही”, “साले महार जाती के लोगों को थूकना भी पसंद नहीं करते”, असे घृणास्पद जातीय वक्तव्य करत शुभम याला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने चाकू दाखवून काउंटरमधील ७-८ हजार रुपये घेऊन पळ काढला.
पोलीस ठाण्याचे उघडपणे दुर्लक्ष – पीडिताला ८ तास बसवूनही FIR नाही
घटनेनंतर दुसऱ्या दिवशी (२३ जून) शुभमने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्याला दुपारी १२ वाजता पोलीस ठाण्यात बोलावून रात्री ८ वाजेपर्यंत केवळ बसवून ठेवण्यात आले आणि पोलीस निरीक्षक यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. याचदरम्यान, आरोपीच्या मदतीसाठी स्थानिक महिला बेबी अग्रवाल पोलीस ठाण्यात पोहोचल्याचेही पीडिताच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कायद्याचे सरळ उल्लंघन — SC/ST Act चे पालन नाही
या घटनेचा थेट संबंध SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९८९ शी असून, या कायद्यानुसार कोणतीही चौकशी न करता, तात्काळ FIR नोंदवणे बंधनकारक आहे. (कलम १८ अ) सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या अनेक निर्णयांमधून हे स्पष्टपणे बजावले आहे. परंतु, गोंदिया पोलिसांनी या कायद्याची थेट पायमल्ली केली आहे.
याव्यतिरिक्त, पीडितावरच दबाव आणून त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप देखील आहेत. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी प्रवीण बोरकुटे यांच्यावरदेखील SC/ST Act अंतर्गत गुन्हा नोंदवणे गरजेचे आहे.
दलित नेत्यांकडून हस्तक्षेप मागणी
आंबेडकरी कार्यकर्ता यांनी या प्रकरणाची तक्रार थेट काँग्रेसचे ज्येष्ठ दलित नेते आणि माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली असून, त्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. संपूर्ण दलित समाजाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.
आंबेडकरी कार्यकर्ते म्हणतात,
“ही केवळ पोलिसांची निष्काळजीपणाची बाब नाही, तर दलितांप्रती असलेली मूळभूत शत्रुत्वाची मानसिकता यातून दिसून येते. पीडितावर अत्याचार झाल्यावरही जर पोलीसच आरोपीच्या बाजूने उभे राहत असतील, तर हा प्रशासनाचा आणि संविधानाचा पराभव आहे.”
मुख्य मागण्या:
१. रोहित उर्फ जवारी भारद्वाज याच्यावर SC/ST Act व IPC अंतर्गत तात्काळ अटक करून कठोर गुन्हा दाखल करावा.
२. पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्यावर SC/ST Act अंतर्गत गुन्हा दाखल करून निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी.
३. प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
ही घटना केवळ शुभम शेंडे यांच्यापुरती मर्यादित नाही. ही घटनात्मक मूल्यांचा आणि सामाजिक न्यायाचा संपूर्ण व्यवस्थेवर असलेला प्रश्न आहे. आता संपूर्ण समाज आणि शासन यांची कसोटी लागली आहे – दलितांना न्याय मिळणार का, की हा हल्ला सामान्य ठरवला जाणार?



