Uncategorized
शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्या ; चढ्या भावाने खत व बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करा
शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्या ; चढ्या भावाने खत व बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करा
-राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
*सिल्लोड* ( प्रतिनिधी ) दि.28, सिल्लोड - सोयगाव मतदारसंघात जवळपास सर्वदूर पाऊस झाला असल्याने आता खरिपातील पेरणीला वेग आला आहे. अशात शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घेवून खते व बियाणांचा मुबलक पुरवठा करा, बोगस बियाणे तसेच खतांचा साठा करून चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा असे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पीक कर्जाच्या भरवशावर शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत असतो. त्यामुळे बँकांनी कोणत्याही प्रकारची अडवणूक पिळवणूक न करता पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्जाचे वाटप करावे अशा सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँकांना दिल्या.
आज मंगळवार रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदार संघातील पीक पेरणीचा आढावा घेवून अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
मतदारसंघात सर्वदूर पाऊस होत असला तरी पाहिजे त्या प्रमाणात अद्याप पर्जन्यवृष्टी झाली नाही. काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली मात्र मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याने यांचावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि यावर्षी पावसाचा झालेला विलंब पाहता शेतकरी संकटात आहे. गेल्या चार दिवसांपासून विविध मंडळात पाऊस झाल्याने खरीप पीक लागवडीसाठी वेग आला आहे. त्यामुळे कृषी व महसुल विभागाने सतर्क राहिले पाहिजे असे स्पष्ट करीत बँकांनी देखील पीक कर्जाच्या संचिका तात्काळ निकाली काढून शेतकऱ्यांना वेळेत कर्ज पुरवठा करावा असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

