थोर महापुरुषांना समर्पित कलाकार मेळावा, 12 जानेवारीला इंदिरानगर सावरीत रंगणार कला महोत्सव…
पोलीस कि आवाज न्युज
जवाहरनगर– समता विचार मंचाच्या वतीने सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त 12 जानेवारी रोजी भव्य कलाकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इंदिरानगर सावरी( जवाहरनगर) येथील अंगणवाडी परिसरात सकाळी 9 वाजेपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
या मेळाव्यात भजन, कीर्तन, नाटक, गोंधळ, दंडार, तमाशा यांसारख्या लोककलेच्या विविध प्रकारांना सादर करण्याची संधी कलाकारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कलाकारांनी थोर महापुरुष, राष्ट्रीय संत, महामानव तसेच महान राजे यांच्या जीवनावर आधारित कलाकृती सादर कराव्यात, असे आवाहन मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्व सहभागी कलाकारांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. लक्ष्मण हारगुडे (ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन समिती सदस्य, भंडारा) यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून मा. ज्योती वाघाये, मा. मनोज कोटांगले, शाहीर कार्तिक मेश्राम, डॉ. देवानंद मेश्राम, आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तीन दिवसीय जयंती महोत्सवाची सुरुवात 10 जानेवारी रोजी भीमगिरी पहाडीतून ढोल-ताशाच्या गजरात भव्य मिरवणुकीने होणार आहे. 11 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता संगीतमय प्रबोधनपर तमाशाचे आयोजन आणि रात्री 8 वाजता “मुलींची पहिली शाळा” हे नाट्यप्रयोग होणार आहेत.
समता विचार मंचाने नागरिकांना या महोत्सवात व विशेषतः 12 जानेवारी रोजी आयोजित कलाकार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
